
प्रतिनिधी -अक्कलकोट, दि. १७ ऑगस्ट २०२६
श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नसून कोट्यवधी भक्तांचा श्वास आहेत. ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ हा त्यांचा अभयमंत्र आजही संकटकाळात भक्तांना धीर देतो. वटवृक्षाच्या रूपाने स्वामी आजही येथे वास करतात, याची प्रचिती अक्कलकोटला आल्यानंतर येते. अशा महान स्वामींच्या मंदिरात परंपरेने सेवा करण्याची संधी इंगळे कुटुंबीयांच्या माध्यमातून चेअरमन महेश मालक इंगळे यांना लाभली आहे. देवस्थान समितीच्या माध्यमातून स्वामींचे सेवाव्रत निष्ठेने पुढे नेणारे महेश इंगळे यांना भेटून आनंद झाला, असे प्रतिपादन भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य व माजी मंत्री बसवराज पाटील यांनी केले.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास आमदार बसवराज पाटील यांनी भेट देऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे तसेच वटवृक्षाचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनानंतर मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश मालक इंगळे यांनी आमदार बसवराज पाटील यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद व स्वामींची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी आमदार पाटील यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. देवस्थानच्या माध्यमातून संचालित भक्तनिवास, तंत्रनिकेतन महाविद्यालय तसेच रुग्णालयाची पाहणी करून देवस्थानच्या व्यवस्थापनाचे त्यांनी कौतुक केले.याप्रसंगी प्रथमेश इंगळे, रशीद गुत्तेदार, महेश हिंडोळे, मनोज इंगुले, महेश पाटील, नितीन पाटील, मंदिर समितीचे पदाधिकारी, सेवेकरी व स्वामीभक्त उपस्थित होते.














