
प्रतिनिधी -माढा, दि. १८ ऑगस्ट २०२६ :
माढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा, म्हैसगाव (मुले) या पूरग्रस्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सेवा भारती, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, पुणे यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या नूतन स्वच्छतागृहाचा लोकार्पण व हस्तांतरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या नूतन स्वच्छतागृहाचे लोकार्पण व हस्तांतरण जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन (भा.प्र.से.) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंढरपूरचे जिल्हा संघचालक डॉ. रमेश सिद्ध यांच्या हस्ते करण्यात आले.


पूरग्रस्त शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरणात शिक्षण घेता यावे, तसेच त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात, या उद्देशाने सेवा भारतीच्या वतीने ही सुविधा उभारण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सुरेल स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या मनमोहक सादरीकरणामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या सोहळ्यास शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विशाल मुळे, तहसीलदार माढा संजय भोसले, गटविकास अधिकारी कुर्डूवाडी महेश सुळे तसेच गटशिक्षणाधिकारी कुर्डूवाडी श्रीधर भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. सेवा भारतीच्या वतीने सामाजिक व व्यवस्थापन प्रमुख सदानंद कुलकर्णी, सचिव प्रदीपजी स्वप्नील आणि सहसचिव प्रदीपजी देशपांडे उपस्थित होते. त्यांनी या सामाजिक उपक्रमाची भूमिका आणि उद्देश याबाबत माहिती दिली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी म्हैसगाव शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच आवश्यक त्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पोषक, सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, शाळेच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यासोबतच शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
कार्यक्रमास म्हैसगाव ग्रामपंचायतीचे सरपंच मुकुंद उबाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनुसिंह राजपूत, केंद्रप्रमुख प्रमोद खरटमल यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी संपूर्ण शाळेची सविस्तर पाहणी केली. त्यांनी वर्गखोल्या, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा, शालेय परिसर तसेच वर्गातील शैक्षणिक सजावटीची पाहणी केली. शाळेतील स्वच्छता, आकर्षक वर्गसजावट आणि विद्यार्थ्यांसाठी निर्माण करण्यात आलेले आनंददायी शैक्षणिक वातावरण पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका श्रीमती कांदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख प्रमोद खरटमल यांनी केले.














