
प्रतिनिधी -सोलापूर, दि. २७ ऑगस्ट २०२६
देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या वीर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम प्री-प्रायमरी व प्रायमरी स्कूल, सोलापूर येथे माजी सैनिकांच्या उपस्थितीत रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमास यश सिद्धी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आयुष्यमान शिवपुत्र घटकांबळे, सोलापूर शाखेचे सचिव आयुष्यमान कॅप्टन बाबुराव भेल भंडारे, संघटक आयुष्यमान हवालदार सूर्यकांत गजगाटे, १९७१च्या युद्धातील वीर लिंबाजी कांबळे तसेच १९८७च्या ऑपरेशन पवनमध्ये सहभागी झालेले वीर हवालदार सुरेश खळसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवर हे महार रेजिमेंटचे माजी सैनिक आहेत.कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती माता आणि ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उपस्थित माजी सैनिकांच्या हातावर राखी बांधून रक्षाबंधनाचा पारंपरिक सण साजरा केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सैनिकांप्रती आदर, कृतज्ञता आणि देशप्रेमाची भावना जोपासण्याचा सुंदर संदेश मिळाला.
यावेळी कॅप्टन बाबुराव भेल भंडारे यांनी आपल्या सैनिकी जीवनातील विविध अनुभव आणि सैनिकांचे कार्य याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच राज्य उपाध्यक्ष शिवपुत्र घटकांबळे यांनी देशाच्या जडणघडणीत सैनिकांचे असलेले अमूल्य योगदान विद्यार्थ्यांसमोर विशद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता सोमवंशी होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आरती तांदळे यांनी केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सैनिकांप्रती आपला स्नेह व्यक्त केल्याने कार्यक्रम भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240















