
प्रतिनिधी – सोलापूर
जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती देतानाच शिक्षण, आरोग्य आणि घरकुल या महत्त्वाच्या क्षेत्रांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून प्राधान्य दिले जात आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पत्रकारांशी संवाद साधत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या कामकाजाची माहिती दिली. पत्रकारांनी शिक्षण, आरोग्य, घरकुल तसेच अन्य महत्त्वाच्या विषयांवर उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.

शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तावाढीसाठी जिल्ह्यात पाच आदर्श शाळा विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये तीन नियमित जिल्हा परिषद शाळा, एक पीएम श्री शाळा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळेचा समावेश आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशासनाच्या समन्वयातून हा उपक्रम पुढे नेण्यात येणार असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.
आरोग्य विभागाचा आढावा देताना जैन यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ३५ आरोग्य केंद्रांना आतापर्यंत NQAS प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळावी, यासाठी ही संख्या १०० पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाकडून आवश्यक नियोजन आणि कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण विभागासाठी आणखी एक महत्त्वाची माहिती देताना जैन यांनी जिल्ह्यात ३५५ शिक्षक नव्याने रुजू होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची उपलब्धता वाढून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणखी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शाळांमध्ये वितरित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या दर्जाबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. यावर गणवेशाचा दर्जा आणि प्रत्यक्ष वितरण याबाबत शिक्षण विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्याचे जैन यांनी सांगितले. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे उपस्थित होते. त्यांनी शिक्षण विभागाशी संबंधित पत्रकारांच्या विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत विभागाच्या कामकाजाची माहिती दिली.
ग्रामीण भागातील शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर शिक्षक पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहितीही मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांनी दिली. ग्रामीण भागात उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत ग्रामीण भागातील घरकुल योजनांच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत मिळावा आणि प्रलंबित कामांना गती मिळावी, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक पाठपुरावा करण्यात येत असल्याचे जैन यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेदरम्यान विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनी शिक्षण व आरोग्य विभागासह जिल्हा परिषदेच्या विविध कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केले. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी प्रत्येक प्रश्नाला शांतपणे आणि स्पष्टपणे उत्तरे देत प्रशासनाची भूमिका मांडली.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240

















