
प्रतिनिधी -दक्षिण सोलापूर
दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथे शेती पंचनाम्याच्या मुद्द्यावरून शेतकरी विठ्ठल रामचंद्र गुरव यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गट क्रमांक 32, 33, 34 आणि 35 संदर्भात खोटे व चुकीचे पंचनामे करण्यात आल्याचा आरोप गुरव यांनी केला असून, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गुरव यांच्या म्हणण्यानुसार, गट क्रमांक 33 मध्ये पंचनामा होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात गट क्रमांक 35 मध्ये पंचनामा करण्यात आला. मात्र, हा पंचनामा गट क्रमांक 33 चा असल्याचे दाखवण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे संबंधित पंचनाम्याची सत्यता आणि त्यामागील कार्यवाही याबाबत त्यांनी संशय व्यक्त केला आहे.
या प्रकरणात तहसीलदारांच्या आदेशानंतरही संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य कार्यवाही होत नसल्याचा आरोप गुरव यांनी केला आहे. तसेच राजकीय दबाव आणि पैशाच्या बळाचा वापर करून आपल्याला विनाकारण त्रास दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रशासनाने या आरोपांची गांभीर्याने दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, संबंधित शेतजमिनीच्या रस्त्याचा वाद सन 2016-17 पासून न्यायालयात प्रलंबित असल्याचे गुरव यांनी सांगितले. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही आपल्यावर दबाव आणला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचीही पारदर्शकता तपासली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“माझी व्यथा कुणासमोर मांडायची? न्याय मागायचा तरी कोणाकडे?” असा संतप्त सवाल करत विठ्ठल गुरव यांनी अखेर प्रसारमाध्यमांसमोर आपली बाजू मांडली. चुकीच्या पंचनाम्यामुळे आपल्या हक्कांवर परिणाम होऊ नये आणि संबंधित कागदपत्रांची योग्य तपासणी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.
या आरोपांमुळे आचेगावातील शेती पंचनाम्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता महसूल प्रशासन या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करणार का? पंचनाम्यात नेमकी चूक कुठे झाली, याची वस्तुस्थिती समोर येणार का? तसेच शेतकरी विठ्ठल गुरव यांच्या तक्रारीवर प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे आचेगावसह दक्षिण सोलापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील संबंधित अधिकारी अथवा प्रशासनाची अधिकृत बाजू समोर आल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240
















