
प्रतिनिधी – सोलापूर प्रतिनिधी :
सोलापूर शहरातील नामांकित नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी शाळेचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, मार्गदर्शिका मीना पारखे, प्राचार्या रश्मी कुंभार यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्या रश्मी कुंभार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना श्रीकृष्ण जन्माचे महत्त्व, त्यांच्या बाललीला तसेच भगवद्गीतेच्या माध्यमातून दिलेला कर्मयोग आणि जीवन जगण्याचा संदेश सोप्या भाषेत समजावून सांगितला. समाजात एकोपा, बंधुभाव आणि संघभावना टिकवून ठेवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
प्री-प्रायमरी व प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाच्या आकर्षक पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. बालगोपाळांच्या मनमोहक रूपामुळे संपूर्ण शाळा परिसराला गोकुळनगरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित भक्तिगीते व विविध नृत्यांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी आणि संस्थेच्या सचिवा सौ. वर्षाताई विभुते यांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते दहीहंडी उत्सव. शाळेच्या मैदानावर सजविण्यात आलेली दहीहंडी फोडण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. प्राचार्या रश्मी कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या तालावर चिमुकल्या गोविंदांनी मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडली. यावेळी उपस्थित शिक्षक व पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना पोह्यांच्या गोपाळकाल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेचे व्यवस्थापन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240















