
प्रतिनिधी – सोलापूर
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी सोलापूर जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमाकांत राजगुरू यांची दणदणीत निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्याला राज्य कार्यकारिणीत महत्त्वाचे प्रतिनिधित्व मिळाले असून, जिल्ह्यातील लेखा कर्मचाऱ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोलापूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राजगुरू यांच्या राज्य उपाध्यक्षपदाची निवड जाहीर करण्यात आली.कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने आवाज उठविणे, विविध प्रश्नांचा शासन व प्रशासन स्तरावर प्रभावीपणे पाठपुरावा करणे तसेच संघटनात्मक कामात नेहमी आघाडीवर राहणे, ही उमाकांत राजगुरू यांची विशेष ओळख आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आणि संघटनेप्रती असलेल्या निष्ठेमुळे त्यांची ही निवड झाल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
राज्य संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या यशस्वी आयोजनातही उमाकांत राजगुरू यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आपल्या उत्कृष्ट संघटन कौशल्याची व नियोजन क्षमतेची छाप पाडली.राज्य संघटनेचे अध्यक्ष मिलिंद दादा कांबळे यांच्यासह राज्य कार्यकारिणीतील पदाधिकारी, जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी व लेखा कर्मचाऱ्यांनी उमाकांत राजगुरू यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

उमाकांत राजगुरू यांच्या राज्य उपाध्यक्षपदी झालेल्या निवडीने सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली लेखा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना राज्यस्तरावर अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
जनता संघर्ष न्यूज सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240















