
प्रतिनिधी – अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक तसेच सर्वसामान्य कुटुंबांसमोर पाणी, अन्न आणि रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुष्काळामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. शेतमजूर व रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांच्या हाताला पुरेसे काम उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्याचबरोबर पशुधनासाठी चारा व पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने दुष्काळग्रस्त जनतेला तातडीने सरसकट मोफत धान्य वाटप करावे, रोजगाराची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करून स्थानिक मजूर व कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा तसेच जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी) रोजगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विकीबाबा चौधरी यांनी केली आहे.दुष्काळग्रस्त जनतेला केवळ आश्वासनांची गरज नसून प्रत्यक्ष मदत आणि तातडीच्या शासकीय उपाययोजनांची आवश्यकता आहे. शासन व प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन विलंब न करता आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी हा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देत असून, दुष्काळग्रस्तांसाठी आवश्यक असलेल्या सर्व मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी ठाम मागणी विकीबाबा चौधरी यांनी केली आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240
















