
प्रतिनिधी – अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे अवैधरित्या वाळू साठवणूक केल्याप्रकरणी तहसीलदारांकडे रीतसर तक्रार करूनही संबंधित प्रकरणाची अद्याप ठोस चौकशी करण्यात आलेली नसल्याचा आरोप माजी सरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते विश्वनाथ विठ्ठल इट्टेनवरू यांनी केला आहे.
मैंदर्गी परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू साठवणूक करण्यात आल्याबाबत त्यांनी अक्कलकोट तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशीसाठी अहवाल पाठविण्यात आला असल्याची उत्तरे मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात मैंदर्गीचे मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून तालुक्यातील राजकीय दबावामुळे वाळू साठ्यातील तफावत योग्य प्रकारे दाखविली जात नसल्याचा आरोपही इट्टेनवरू यांनी केला आहे.
यासंदर्भात त्यांनी तहसीलदारांकडे दुसऱ्यांदा लेखी तक्रार करून संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. मात्र, रीतसर पत्रव्यवहार करूनही संबंधित प्रकरणातील व्यक्तींची चौकशी होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, पंचाक्षरी मठाच्या नावाखाली वाळू साठवून त्याचा अन्य ठिकाणी गैरवापर होत असल्याचा आरोपही विश्वनाथ इट्टेनवरू यांनी केला आहे. प्रशासनाकडे वारंवार पत्र व तक्रारी दाखल करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240















