
प्रतिनिधी – सोलापूर
बॉबी ग्रुपचे संस्थापक अजित भाऊ गायकवाड यांची कन्या सांची अजित गायकवाड हिला एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी अश्विनी रुग्णालयात प्रवेश मिळाल्याने गायकवाड परिवारासह न्यू बुधवार पेठ परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सांची गायकवाड हिचा मित्रपरिवाराच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष तथा कामगार नेते बापूसाहेब सदाफुले आणि माजी नगरसेवक अरुण भालेराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना कामगार नेते बापूसाहेब सदाफुले म्हणाले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दलित पॅंथर तसेच फुले-शाहू-आंबेडकर चळवळीत ज्येष्ठ नेते दिवंगत एस. आर. दादा गायकवाड यांनी समाजातील अनेक अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत बॉबी ग्रुपचे संस्थापक अजित भाऊ गायकवाड आणि वंदनाताई गायकवाड हे समाजात चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत.

कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाच अजित भाऊ गायकवाड यांनी आपल्या सर्व भावंडांना सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. सामाजिक कार्यात सक्रिय असतानाही त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. सांचीला उत्तम शिक्षण आणि चांगले संस्कार देत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेले कष्ट आज फळाला आले आहेत, असेही सदाफुले यांनी सांगितले.
अनेक अडचणींवर मात करून अजित भाऊ गायकवाड यांनी आपल्या कन्येला डॉक्टर होण्याच्या मार्गावर पोहोचवले आहे. न्यू बुधवार पेठ परिसरातील पहिलीच कन्या डॉक्टर होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याने हा केवळ गायकवाड परिवारासाठीच नव्हे, तर संपूर्ण परिसरासाठी अभिमानाचा क्षण आहे. बहुजन समाजातील युवक-युवतींनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या परिवाराचे आणि परिसराचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन करत बापूसाहेब सदाफुले यांनी सांचीच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्री छत्रपती रुग्णालयाचे अधिकारी धीरजकुमार माने यांनीही सांचीचे अभिनंदन केले. अजित भाऊ गायकवाड यांनी सामाजिक कार्याची जबाबदारी पार पाडतानाच आपल्या मुलीला उत्तम शिक्षण दिले असून, या यशामागे आई-वडिलांची प्रचंड मेहनत असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांनी चांगले शिक्षण घेऊन आई-वडिलांचे नाव मोठे करावे, हा आदर्श सांचीने आपल्या यशातून निर्माण केला आहे, असे माने म्हणाले.
माजी नगरसेवक अरुण भालेराव म्हणाले की, अजित भाऊ गायकवाड यांच्या परिवाराशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांच्या वडिलांचा संघर्ष मी जवळून पाहिला आहे. आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी परिवाराने घेतलेले अपार कष्ट आज साकार झाले असून, हे गायकवाड परिवारासाठी अत्यंत आनंदाचे आणि अभिमानाचे क्षण आहेत.
यावेळी आप्पासाहेब गायकवाड, अमोल झेंडे, श्रीकांत भंडारे, सुधाकर राजगुरू, दीपक इंगळे, बाळासाहेब फाटके, विशाल गायकवाड यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिक, मित्रपरिवार आणि गायकवाड परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांची गायकवाड हिच्या यशामुळे गायकवाड परिवारासह संपूर्ण न्यू बुधवार पेठ परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, तिच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















