
प्रतिनिधी – सोलापूर
सोलापूर शहरात घरफोडी, सोन्याच्या दागिन्यांची चोरी, चेनस्नॅचिंग आणि मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींवर गुन्हे शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे.
पोलिसांनी दोन घरफोडी, दोन ज्वेलरी चोरी आणि एक मोटारसायकल चोरी असे पाच गुन्हे उघडकीस आणत तब्बल 16 लाख 69 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत यश ऊर्फ सोन्या ज्ञानेश्वर खतले याला ताब्यात घेत त्याच्याकडून 81 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दुचाकी असा 12 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.दरम्यान, अशोक चौक परिसरातील चेनस्नॅचिंग प्रकरणात सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संघर्ष उत्तम वाघमारे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सोन्याची चेन आणि गुन्ह्यातील वाहन असा 2 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.
तसेच मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या अजय पंडित आणि राहुल आमराव या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून 45 हजार रुपयांच्या सोन्याच्या दोन वाट्या हस्तगत करण्यात आल्या.
याचवेळी गुन्हे शाखेने अमली पदार्थविरोधी कारवाई करत 2 किलो 11 ग्रॅम गांजा जप्त केला. गांजा आणि दुचाकीसह 1 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, दोन आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्या सूचनेनुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकांनी ही धडाकेबाज कारवाई केली.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240
















