
प्रतिनिधी – विंचूर
दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथे शनिवारी (दि. १२ सप्टेंबर) सकाळच्या सुमारास घरगुती गॅस सिलेंडरचा जोरदार स्फोट होऊन दोन घरांना भीषण आग लागली. या दुर्घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे आणि अन्य वस्तू जळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विंचूर येथील सुरुबाई देवकते यांच्या घरात सकाळी सुमारे १०.३० ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान अचानक सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटानंतर घराला आग लागली आणि काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत देवकते यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर शेजारील आंबण्णा कोळी यांच्या घरालाही आगीची झळ बसली.
घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत पोलीस हवालदार दावणे, पोलीस शिवणे तसेच होमगार्ड जवान उपस्थित होते. अग्निशमन दलाची प्रतीक्षा न करता डांगे यांनी ग्रामस्थांना सोबत घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
पोलिसांसह ग्रामस्थांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पोलीस उपनिरीक्षक डांगे यांनी स्वतः घटनास्थळी राहून बचावकार्याला दिशा दिली. त्यांच्या तत्पर प्रतिसादामुळे तसेच ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या आगीत दोन्ही घरांतील मोठ्या प्रमाणावर साहित्य जळून खाक झाले असून, नुकसानीचा आकडा लाखोंच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, सिलेंडरचा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला आणि एकूण किती आर्थिक नुकसान झाले, याबाबत मंद्रूप पोलीस ठाण्याच्या वतीने तपास सुरू आहे.
घटनेनंतर तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्याला गती दिल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे यांच्या तत्परतेचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

















