
प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर
दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नूतन वर्गखोली उद्घाटन व माजी विद्यार्थी मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित या कार्यक्रमास ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे उद्घाटन दक्षिण सोलापूरचे आमदार मा. सुभाष (बापू) देशमुख यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी विद्यार्थी व विलेपार्ले, मुंबई येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मा. अमृत बिराजदार होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले की, राजूर गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कामांबाबत ग्रामस्थांनी लिखित स्वरूपात निवेदन द्यावे. गावाच्या विकासासाठी आवश्यक ती कामे मार्गी लावण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू. तसेच राजूरची जिल्हा परिषद शाळा ही आदर्श शाळा असून, या शाळेने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी घडवले आहेत. राज्याच्या आणि देशाच्या जडणघडणीत या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अमृत बिराजदार यांनी बदलत्या काळात विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा शिक्षणासाठी योग्य पद्धतीने कसा वापर करावा, तसेच AI वापरताना कोणत्या बाबींपासून सावध राहावे, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विशाल मुळे, गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार, मंद्रूपचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, केंद्रप्रमुख सरफराज हुसैनी, राजूरचे सरपंच सतीश देवकते, उपसरपंच ललिता मळेवाडी, ग्रामसेवक सोमनिंग पुजारी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम मळेवाडी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब शेळके, गटविकास अधिकारी मनोज राऊत व शिक्षणविस्तार अधिकारी गुरुबाळा सणके यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
माजी विद्यार्थी मेळाव्यामुळे शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. माजी मुख्याध्यापक यशवंत देवकते, मुंबई येथील शिक्षक यल्लाका बिराजदार, पीएच.डी. धारक लक्ष्मण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य इंदुमती राधाकृष्ण पाटील, माजी विद्यार्थी निर्मला बिराजदार यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी व माजी शिक्षक सहभागी झाले.



दरम्यान, प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात तसेच पारंपरिक लेझीमच्या माध्यमातून केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वागतगीत व नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा सुधार समिती, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी आणि राजूर ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम मळेवाडी यांनी केले.
जनतासंघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक सिद्धार्थ भडकुंबे
तम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579828240

















