
सोलापूर | प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी तूर, उडीद, कांदा यासह विविध खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलती व मदत तातडीने द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक आनंदराव देवकते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात देवकते यांनी म्हटले आहे की, पावसाअभावी शेतातील उभी पिके करपली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यापूर्वी अतिवृष्टी व महापुरामुळेही शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून खरीप पिकांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये, तर फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपये अनुदान मंजूर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच कर्जमाफी योजनेत थकबाकीदार शेतकऱ्यांप्रमाणे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दक्षिण सोलापूर तालुका दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व सवलती व मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती देवकते यांनी केली आहे.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक -सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240















