
सोलापूर | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल, पथारी सुरक्षा दल आणि झोपडपट्टी सुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात कार्यकर्ता मेळावा, नूतन पदाधिकारी निवड तसेच सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी रंगभवन समाजकल्याण केंद्र येथे दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
संस्थापक तथा अध्यक्ष लोकनेते भगवानराव बैटाट यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य सरचिटणीस काशिनाथ गायकवाड, राज्य संघटक सुरेखाताई भालेराव आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण यांच्या माध्यमातून नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी दशरथ पवार यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, अंबिका गायकवाड यांची जिल्हा महिला अध्यक्षपदी, संतोष आलेगावकर यांची शहर अध्यक्षपदी, वर्षाताई गायकवाड यांची महिला शहर अध्यक्षपदी, सरदार चव्हाण यांची जिल्हा संघटकपदी, विठोबा राठोड यांची शहर संघटकपदी, इंदुमती निकंबे यांची जिल्हा महिला उपाध्यक्षपदी, चरणसिंग राठोड यांची दक्षिण तालुका अध्यक्षपदी आणि शिवानंद राठोड यांची दक्षिण तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.



नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कामगार, पथारी व्यावसायिक आणि झोपडपट्टीधारकांच्या विविध प्रश्नांवर संघटितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.


झोपडीधारकांना मालकी हक्क देण्याची मागणी
दरम्यान, संघटनेच्या वतीने शासनाकडे झोपडीधारकांच्या मालकी हक्काचा प्रश्न मार्गी लावण्याची जोरदार मागणी करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या, निमशासकीय, वन तसेच गायरान भूखंडांवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या पात्र झोपडीधारकांचे सर्वेक्षण करून त्यांना त्यांच्या वास्तव्यास असलेल्या जागेचा मालकी हक्क देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
दि. १ जानेवारी २०१८ पर्यंत संबंधित जागांवर वास्तव्यास असलेल्या पात्र झोपडीधारकांचे सर्वेक्षण करून त्यांना सातबारा उतारा देण्यात यावा. तसेच प्रत्येक पात्र झोपडीधारक कुटुंबाला दोन गुंठे जमीन देण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
घरकुल व शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी
झोपडपट्ट्यांमध्ये अनेक कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. त्यांचे संसार, उपजीविका आणि दैनंदिन जीवन याच ठिकाणी रुजलेले असतानाही जमिनीच्या मालकी हक्काचा अधिकृत दस्तऐवज नसल्याने त्यांना घरकुल, कर्ज, शासकीय योजना आणि इतर मूलभूत सुविधांचा लाभ घेताना अडचणी येत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यामुळे शासनाने पात्र झोपडीधारकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून कागदपत्रांची पडताळणी करावी, पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करावी आणि मालकी हक्क देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी व घरकुलाच्या प्रश्नासाठी गृहनिर्माण संस्था स्थापन करून त्यांना थोर राष्ट्रीय महापुरुषांची नावे देण्याची मागणीही यावेळी मांडण्यात आली.
शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी
यावेळी दत्ता दाडर यांनी कामगार व झोपडपट्टीधारकांच्या विविध प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच झोपडपट्टीधारकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी संघटना सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
झोपडीधारकांच्या प्रश्नांवर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन दि. २५ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणीही करण्यात आली. तळागाळातील नागरिकांना हक्काचे घर आणि जमिनीचा मालकी हक्क मिळावा, तसेच अतिक्रमण नियमितीकरणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी संघटनेचा पुढील काळातही पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे दाडर यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास राज्य सरचिटणीस काशिनाथ गायकवाड, राज्य संघटक सुरेखाताई भालेराव, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विमुक्त जाती जमाती भटक्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सौ. टिशा माडेवार, पुणे जिल्हाध्यक्ष दत्ताजी दाडर, माजी नगरसेविका शैलजाताई प्रेमसिंग राठोड,मातोश्री पुष्पलताजी पाटिल महाराज इंचगिरीमठ गिरीराज मंदिर नेहरूनगर सोलापूर,सोलापूर जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण यांच्यासह विविध पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शाहीर रमेश खाडे यांनी केले तर आभार जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण यांनी मानले.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240















