
प्रतिनिधी – उत्तर सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच पावसाच्या अनियमिततेमुळे झालेल्या नुकसानीची वस्तुस्थिती जाणून घेतली.

यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनिश्चिततेचा सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांतील पिकांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारंबा परिसरातील शेतांमध्ये जाऊन पिकांची सद्यस्थिती, उत्पादनातील संभाव्य घट आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी याबाबत माहिती घेतली. तसेच जिल्ह्यातील टंचाईसदृश परिस्थिती आणि खरीप हंगामातील पिकांच्या स्थितीचा आढावा घेतला.
यावेळी शेतकरी बांधवांनी पिकांचे झालेले नुकसान, पावसातील अनियमितता तसेच निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन परिस्थिती जाणून घेतल्याने शासनाच्या स्तरावर आवश्यक उपाययोजनांना दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या पाहणी दौऱ्यादरम्यान सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार राजेंद्र राऊत, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, देवेंद्र कोठे, राजू खरे, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर संपादक -सिद्धार्थ भडकुंबे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240
















