
प्रतिनिधी – सोलापूर
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील पत्रकार ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता वार्तांकनाचे काम करीत असतात. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये तसेच मंत्री, खासदार, आमदार यांच्या बैठका, दौरे, सभा व विविध कार्यक्रमांचे वार्तांकन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना वारंवार जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करावा लागतो.
जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, सिव्हिल हॉस्पिटल, नियोजन भवन यांसह विविध शासकीय कार्यालयांमध्ये पत्रकारांना बातमीच्या निमित्ताने जावे लागते. मात्र ग्रामीण भागातील अनेक पत्रकार अल्प मानधनावर काम करीत असल्याने मोटारसायकलने जिल्ह्याच्या ठिकाणी ये-जा करणे आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरत आहे. पेट्रोलचा वाढता खर्च आणि रस्त्यावरील प्रवासाची जोखीम यामुळे वार्तांकनासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येणे अनेक पत्रकारांसाठी जिकिरीचे झाले आहे.या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा मिळावी, या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना ६ मार्च २०२५ रोजी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर ५ मार्च २०२६ रोजी पुणे येथील विभागीय आयुक्तांकडेही याबाबत निवेदन सादर करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे आवश्यक पत्रव्यवहार करण्याची विनंती करण्यात आली होती.
तसेच पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात राज्यसभेच्या खासदार ज्योतीताई वाघमारे यांची भेट घेऊन ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अडचणी मांडल्या. एसटी बसमधून ग्रामीण पत्रकारांना मोफत प्रवासाची सुविधा मिळावी, अशी मागणी करणारे निवेदनही त्यांना देण्यात आले.
मात्र अद्याप राज्य सरकारच्या पातळीवर याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे समितीने म्हटले आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटीमधून मोफत प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने प्रशासकीय पातळीवर तसेच राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
लवकरच सोलापूर विभागीय नियंत्रक, राज्य परिवहन विभाग यांची भेट घेऊन ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्याबाबत निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















