
प्रतिनिधी – सोलापूर
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कार्यकारी समितीची तसेच सन २०२६-२७ पी.आय.पी. (PIP) आढावा बैठक गुरुवारी, दि. २४ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

बैठकीत सन २०२६-२७ च्या पी.आय.पी.मध्ये मंजूर झालेल्या विविध आरोग्यविषयक बाबींचा आढावा घेण्यात आला. मंजूर योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक नियोजन व कार्यवाहीला गती देण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीत एनएचएम पी.आय.पी.चा आढावा घेऊन मंजूर बाबींच्या अंमलबजावणीचे नियोजन, तसेच पंधरावा वित्त आयोगांतर्गत सुरू असलेल्या बांधकाम कामांचा आढावा घेण्यात आला. तालुकास्तरावरील प्रयोगशाळांच्या बांधकामासह आवश्यक साहित्य खरेदीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.तसेच मंजूर निधीचा मार्च २०२७ अखेर पूर्णपणे विनियोग करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सेवा संकल्पत अभियानांतर्गत डीबीटीचा लाभ देण्यासाठी लाभार्थी, आशा स्वयंसेविका व आरोग्य सेविकांचे आधार सीडिंग करण्यासाठी शिबिरे आयोजित करून प्रलंबित देयके अदा करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
साखर कारखाना परिसरात ऊसतोड कामगारांसाठी आरोग्य तपासणी व आरोग्यविषयक शिबिरे आयोजित करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापनाबाबत संबंधित नियुक्त कंपनीसोबत बैठक घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
याशिवाय प्रलंबित व थकीत देयके तातडीने सादर करणे, तसेच खराब झालेल्या कोल्ड चेन उपकरणांची दुरुस्ती करण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.बैठकीस आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सन २०२६-२७ मधील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने बैठकीत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक -सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240
















