
प्रतिनिधी – पंढरपूर
स्वर्गीय मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त ‘आपला माणूस, आपली गाणी’ कराओके व लाईव्ह ऑर्केस्ट्रा, पंढरपूर यांच्या वतीने सोलापूर जिल्हास्तरीय कराओके गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४.३० ते रात्री ९.३० या वेळेत इसबावी, पंढरपूर येथील श्रीराम मंगल कार्यालयात ही सुरेल मैफल रंगणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन पांडुरंग परिवाराचे नेते उमेश परिचारक यांच्या हस्ते होणार आहे.
जुन्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर गायक-गायिकांच्या गीतांना उजाळा देतानाच नवोदित व हौशी गायकांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. जिल्हाभरातून शंभरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून, त्यामुळे स्पर्धेत रंगतदार चुरस पाहायला मिळणार आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास नगरसेवक विशाल मलपे यांच्या वतीने १० हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी समाजसेविका अनिता पवार यांच्या वतीने ६ हजार रुपये व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकासाठी समाजसेवक प्रमोद शहा यांच्या वतीने ५ हजार रुपये व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, स्पर्धकांसोबतच उपस्थित रसिकांसाठीही आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. संगीतप्रेमी रसिकांना मोफत लकी ड्रॉ कुपन देण्यात येणार असून, त्यातून निवड झालेल्या आठ भाग्यवान रसिकांना आकर्षक भेटवस्तू मिळणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर शहरातील रसिकांसाठी हा संपूर्ण कार्यक्रम मोफत ठेवण्यात आला आहे. जुन्या हिंदी गीतांसोबतच भक्तिगीतांचा सुरेल आनंद घेण्यासाठी संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक विलास जगधने यांनी केले आहे.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579837240

















