
सोलापूर | प्रतिनिधी
जिल्हा परिषद चंद्रपूर येथील मुख्य लेखा व वित्त अधिकारी (CAFO) श्री. अतुलकुमार गायकवाड यांच्या वादग्रस्त कामकाजाच्या शैलीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये लेखा कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करणार आहेत.

दि. ५ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबत निषेधाचा ठराव करण्यात आला होता. लेखा कर्मचाऱ्यांच्या वारंवार बदल्या करणे, कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे, मागील तीन वर्षांपासून लेखा कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल (CR) न लिहिणे, महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांना त्रास देणे तसेच धमकावणे, अशा विविध कारणांमुळे चंद्रपूर येथील कर्मचारी त्रस्त असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर झालेल्या बदलीविरोधात संबंधित प्रकरण MAT मध्ये नेऊन बदली रद्द करण्यात आल्याचेही संघटनेने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य लेखा कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या आदेशानुसार राज्यभर काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना देण्यात आले आहे. तसेच श्री. सूर्यकांत भुजबळ आणि मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी श्रीमती मीनाक्षी वाकडे यांनाही निवेदन देऊन आंदोलनाची माहिती देण्यात आली आहे. श्री. अतुलकुमार गायकवाड यांचे निलंबन करावे तसेच यापुढे त्यांना जिल्हा परिषदेकडील नियुक्ती देऊ नये, अशी मागणी संघटनेने केली आहे.
लेखा विभागातील कर्मचारी हे जिल्हा परिषदेच्या आर्थिक व प्रशासकीय कामकाजातील महत्त्वाचा घटक आहेत. त्यांच्या कामकाजाचा जिल्हा परिषदेच्या आर्थिक शिस्तीशी आणि दैनंदिन प्रशासकीय व्यवहाराशी थेट संबंध असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अडचणी व प्रश्नांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक व समन्वयात्मक पद्धतीने तोडगा काढावा, अशी अपेक्षा सोलापूर शाखेचे जिल्हाध्यक्ष आनंद जाधव व राज्य उपाध्यक्ष उमाकांत राजगुरू यांनी व्यक्त केली.
दरम्यान, दि. २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या काळ्या फितीच्या आंदोलनाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन लेखा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घ्यावा आणि चंद्रपूर येथील सीएएफओंच्या कामकाजाबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना, सोलापूरच्या वतीने करण्यात आली आहे.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क –9579838240

















