
प्रतिनिधी – सोलापूर
चंद्रपूर जिल्हा परिषदेमधील मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुलकुमार गायकवाड यांच्या कथित वादग्रस्त कामकाजाच्या पद्धतीविरोधात महाराष्ट्र राज्य लेखा कर्मचारी संघटनेने सोमवारी राज्यभर निषेध आंदोलन पुकारले. या आंदोलनाला पाठिंबा देत सोलापूर जिल्हा परिषद लेखा विभागातील ९० हून अधिक कर्मचाऱ्यांनी दिवसभर काळ्या फिती लावून काम केले. तसेच दक्षिण सोलापूर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांनीही काळ्या फिती लावून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
चंद्रपूर जिल्हा परिषदेत लेखा कर्मचाऱ्यांच्या वारंवार बदल्या करणे, कर्मचाऱ्यांना कथित अपमानास्पद वागणूक देणे, मागील तीन वर्षांपासून कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल न लिहिणे, महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांना त्रास देणे तसेच धमकावल्याच्या तक्रारी संघटनेने केल्या आहेत. या कथित प्रकारांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, संबंधित प्रकरणाची प्रशासकीय पातळीवर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी, तसेच त्यांचे निलंबन करून यापुढे जिल्हा परिषद स्तरावर नियुक्ती देऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागण्यांकडे शासन व जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दक्षिण सोलापूर पंचायत समितीतील लिपिक कर्मचारी संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी मनोज राऊत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून संघटनेच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला.जिल्हा परिषदेच्या आर्थिक व प्रशासकीय व्यवस्थेत लेखा विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. निधीचे व्यवस्थापन, आर्थिक शिस्त, देयके, लेखापरीक्षण तसेच दैनंदिन प्रशासकीय व्यवहाराशी संबंधित विविध कामांमध्ये लेखा कर्मचाऱ्यांचा थेट सहभाग असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारींकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात संवादातून प्रश्न सोडविण्याची भूमिका घेणे गरजेचे असल्याचे कर्मचारी संघटनेचे नेते तथा प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांच्या तक्रारींची वस्तुनिष्ठ चौकशी करून संबंधित बाबींमध्ये सत्यता आढळल्यास योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करावी, तसेच कर्मचाऱ्यांच्या कामकाजासाठी सकारात्मक आणि सुसंवादाचे वातावरण निर्माण करावे, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
या आंदोलनामुळे सोलापूर जिल्हा परिषद तसेच दक्षिण सोलापूर पंचायत समितीतील लेखा व संबंधित कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या मागण्यांना पाठिंबा देत आपली एकजूट दाखवून दिली.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

















