
प्रतिनिधी – सोलापूर
सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय माहितीचा अधिकार दिन यशवंतराव चव्हाण सभागृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नागरिकांना पारदर्शक, उत्तरदायी व सुलभ प्रशासन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात माहिती अधिकार कायद्याच्या विविध पैलूंवर अधिकारी-कर्मचाऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष तथा बांधकाम व अर्थ समिती सभापती इंद्रजीत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सूर्यकांत भुजबळ, विविध विभागांचे विभागप्रमुख तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक यशदा चे मुख्य प्रशिक्षक शिवाजी पवार यांनी माहिती अधिकार कायद्याबाबत अत्यंत सविस्तर व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

माहिती अधिकाराचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित माहिती कोणत्या पद्धतीने तपासावी, उपलब्ध माहितीचे स्वरूप, माहिती देताना घ्यावयाची दक्षता, कायदेशीर तरतुदी, प्रथम अपील तसेच पुढील प्रक्रियेबाबत त्यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना सविस्तर माहिती दिली.
“माहिती अधिकार कायद्याची भीती न बाळगता त्याचा योग्य अभ्यास करणे आवश्यक आहे. कायदा समजून घेतल्यास माहिती अधिकाराशी संबंधित अर्ज हाताळताना अडचण निर्माण होत नाही. नियमांच्या चौकटीत राहून नागरिकांना योग्य, स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे,” असे शिवाजी पवार यांनी सांगितले.
विविध उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी माहिती अधिकार कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करावी, याचे स्पष्टीकरण केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी आपल्या मनोगतात माहिती अधिकार हा लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाचा कायदा असल्याचे सांगितले.
“नागरिकांना शासनाच्या कामकाजाची माहिती मिळणे हा लोकशाही व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. प्रशासनामध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी आपल्या मनोगतात माहिती अधिकार अर्जांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन अधिकारी-कर्मचाऱ्यांना केले.
“माहिती अधिकाराच्या अर्जाला घाबरण्याचे कारण नाही. माहिती अधिकार कायदा आणि त्यातील तरतुदी समजून घेऊन, नियमांच्या चौकटीत राहून नागरिकांना आवश्यक माहिती सुलभ, स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने उपलब्ध करून द्यावी. सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने* नागरिकांना वेळेत, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देणे ही प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे,” असे कुशल जैन यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “नागरिकांनी माहिती मागितली म्हणून दबाव घेण्याची गरज नाही. कायदा काय सांगतो, नियम काय आहेत आणि कोणती माहिती उपलब्ध करून देता येते, हे समजून घेऊन योग्य कार्यवाही करावी. प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने आपल्या विभागाशी संबंधित माहिती अधिकाराच्या तरतुदींचा अभ्यास करावा.”
कार्यक्रमात विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागांनी प्रयत्न केले.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

















