
प्रतिनिधी- अक्कलकोट/दक्षिण सोलापूर
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सर्वसमावेशक आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र जेऊर (अक्कलकोट) तसेच बोरामणी (दक्षिण सोलापूर) येथे CPHC (Comprehensive Primary Health Care) प्रशिक्षण पार पडले.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपखडे तसेच पुणे येथील प्राचार्य डॉ. सुहास कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना विविध आजारांचे निदान, प्रतिबंध, उपचार तसेच नागरिकांना आवश्यक असलेल्या प्राथमिक आरोग्य सेवांबाबत अधिक सक्षम करण्यावर प्रशिक्षणात भर देण्यात आला.

प्रशिक्षणामध्ये गर्भावस्था, प्रसूतीदरम्यान व प्रसूतीनंतरची काळजी, नवजात शिशू व अर्भकांच्या आरोग्य सेवा, बालक व किशोरवयीन आरोग्य, संसर्गजन्य आजार, सामान्य आजार, असंसर्गजन्य आजार, डोळे-कान-नाक-घसा संबंधित आजार, मौखिक आरोग्य, वृद्धापकाळातील आरोग्य सेवा, पॅलिटिव्ह केअर, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, मानसिक आरोग्य तसेच योग व आयुष उपचार** आदी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

यासोबतच आरोग्य सेवा देताना आवश्यक असणाऱ्या मातृत्व कौशल्यांसह विविध व्यावहारिक बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच वेळेवर आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा मिळावी, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, हा या प्रशिक्षणामागील प्रमुख उद्देश होता.

या प्रशिक्षणादरम्यान डॉ. अश्विन करजखेडे (THO), डॉ. नंदकिशोर घाडगे (ADHO), डॉ. श्रीकांत कुलकर्णी (RMO), डॉ. रोहन वायचळ (दंतचिकित्सक), डॉ. इंदलकर (नेत्रतज्ज्ञ), डॉ. घोडके (आयुष अधिकारी), डॉ. सोहिल अख्तर मुजावर (CPHC) यांच्यासह अप्पासाहेब सरोळे (HA), संगिता हेडे (ANM), रोहिणी माने (ANM), दादासाहेब फुंदे (HA), कराड मॅडम (ANM), घोडके मॅडम (ANM) आणि रफिक शेख (HA) आदी उपस्थित होते.

या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कौशल्यात वाढ होऊन नागरिकांना अधिक दर्जेदार, सर्वंकष आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

















