
प्रतिनिधी – अक्कलकोट
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोट यांच्याकडून हैद्रा येथील दर्ग्याच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी मोठ्या रकमेची देणगी दिली जाणार असल्याची बातमी अलीकडेच काही वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली होती. मात्र, ही माहिती चुकीची असून मंडळाने कोणत्याही प्रकारची देणगी अथवा आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिलेले नाही, असा जाहीर खुलासा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांनी केला आहे.

हैद्रा दर्गा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सौरऊर्जा प्रकल्पासाठी मदतीच्या संदर्भात अन्नछत्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली होती. मात्र, या विषयावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही किंवा देणगी देण्याबाबत कोणताही शब्द देण्यात आलेला नाही, असे जनमेजयराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, देणगी देण्यात येणार असल्याच्या प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे स्वामीभक्त आणि नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टच्या वतीने सर्व स्वामीभक्त, देणगीदार आणि नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, या प्रकरणाबाबत कोणत्याही अफवांवर किंवा अपुऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये.
मंडळाची भूमिका स्पष्ट असून, सर्व स्वामीभक्तांनी कोणताही गैरसमज करून न घेता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टवरील आपली श्रद्धा आणि विश्वास कायम ठेवावा, असे नम्र आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240















