
प्रतिनिधी – अक्कलकोट
अक्कलकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गट, मायक्रो फायनान्स कंपन्या तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडून करण्यात येणारी सक्तीची कर्जवसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे अक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी तहसीलदार विनायक मगर यांना निवेदन सादर केले. मागणीची दखल न घेतल्यास रिपाइंच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सध्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला बचत गटातील सदस्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक कुटुंबांच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने दैनंदिन गरजा भागविणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी दबाव आणल्यास नागरिकांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा. संबंधित बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना सक्तीची कर्जवसुली थांबविण्याबाबत आवश्यक निर्देश द्यावेत, तसेच महिला बचत गटांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जनहिताच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा
दुष्काळग्रस्त नागरिकांना आर्थिक संकटातून दिलासा मिळणे गरजेचे आहे. अशा कठीण काळात कर्जवसुलीच्या दबावामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने जनहिताच्या दृष्टीने तातडीने योग्य पावले उचलावीत, अशी भूमिका अविनाश मडिखांबे यांनी मांडली.
यावेळी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, तालुका उपाध्यक्ष आंबादास गायकवाड, प्रकाश गडगडे, दत्ता कांबळे, राजू कांबळे, ताहीर शेख, राजू हडपद, अर्जुन बावकर, पूजा सनगुंदी, अजय कांबळे, निंगप्पा निंबाळ, शंकर बनसोडे आदी उपस्थित होते.
“दुष्काळाच्या संकटात सर्वसामान्य जनतेला दिलासा द्या आणि सक्तीच्या कर्जवसुलीला तात्काळ स्थगिती द्या; अन्यथा रिपाइंच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा अविनाश मडिखांबे यांनी दिला.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क –9579838240
















