बनावट पोलीस अधिकारी, गुंतवणुकीचे आमिष आणि संशयास्पद लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन; फसवणूक झाल्यास १९३० वर संपर्क साधा.

प्रतिनिधी – सोलापूर,
डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेऊन सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे नवनवे मार्ग अवलंबले जात आहेत. एका संशयास्पद लिंकवर क्लिक करणे, अनोळखी व्यक्तीला ओटीपी सांगणे किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती शेअर करणे नागरिकांना आर्थिकदृष्ट्या महागात पडू शकते. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहा आणि सायबर सुरक्षेला प्राधान्य द्या, असे आवाहन सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले.

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय आणि क्राइम पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी सायबर गुन्हे विषयक जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे विविध प्रकार, सोशल मीडिया सुरक्षितता, डिजिटल व्यवहारांमधील खबरदारी आणि सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शहरातील सुमारे ८० पत्रकारांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली आर्थिक फसवणूक
सायबर गुन्हेगार नागरिकांना मानसिक दबावाखाली आणून त्यांची आर्थिक फसवणूक करत आहेत. पोलीस किंवा तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवणे, व्हिडिओ कॉलद्वारे चौकशीचा बनाव करणे आणि ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पैशांची मागणी करणे, असे प्रकार घडत आहेत.
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवूनही नागरिकांना फसवले जाते. गॅस बिल थकीत असल्याचे सांगणे, सेवा बंद होण्याची भीती दाखविणारे बनावट संदेश पाठवणे तसेच इन्स्टंट लोन अॅपच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती मिळवून ब्लॅकमेल करणे, अशा प्रकारांबाबतही कार्यशाळेत माहिती देण्यात आली.
संशयास्पद लिंकपासून सावध राहा!
मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंक, व्हॉट्सअॅपवरील संशयास्पद संदेश आणि आकर्षक ऑफर यांच्याबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोणतीही लिंक उघडण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी. बँकेचा ओटीपी, पासवर्ड, एटीएम किंवा कार्डची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून मोबाइलमध्ये रिमोट अॅक्सेस अॅप इन्स्टॉल करू नये किंवा स्क्रीन शेअर करू नये.
मोठ्या परताव्याचे आमिष दाखविणाऱ्या गुंतवणूक योजनांची अधिकृत माहिती तपासल्याशिवाय पैसे गुंतवू नयेत. केवळ विश्वासार्ह दिसणारा संदेश, लोगो किंवा गणवेश पाहून संबंधित व्यक्ती खरी असल्याचे गृहीत धरू नये, असा सल्लाही सायबर तज्ज्ञांनी दिला.

फसवणूक झाल्यास तातडीने १९३० वर संपर्क साधा
सायबर किंवा आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वेळ न घालवता १९३० या राष्ट्रीय सायबर आर्थिक फसवणूक हेल्पलाइनवर संपर्क साधावा. तसेच भारत सरकारच्या राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर तक्रार नोंदवावी. तातडीने तक्रार केल्यास संबंधित व्यवहाराचा मागोवा घेऊन फसवलेली रक्कम रोखण्याची किंवा गोठविण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे फसवणूक झाल्यानंतर संकोच न करता त्वरित तक्रार करणे महत्त्वाचे आहे.
पोलीस अधिकारी आणि सायबर तज्ज्ञांची उपस्थिती

या कार्यशाळेला पोलीस उपायुक्त (गुन्हे) अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ) प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे आणि क्राइम पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल भांगे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते.

सायबर तज्ज्ञ अविनाश पाटील आणि महिला पोलीस अंमलदार प्रांजली काळे यांनी प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांची कार्यपद्धती समजावून सांगितली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कार्यशाळेत सहभागी पत्रकारांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. इम्रान सगरी यांनी आभार मानले.
सायबर सुरक्षा ही काळाची गरज असून, जागरूकता आणि सतर्कता हाच ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव करण्याचा प्रभावी मार्ग आहे. नागरिकांनी सुरक्षित डिजिटल व्यवहारांचा अवलंब करावा आणि सायबर गुन्ह्यांविषयीची योग्य माहिती समाजापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

















