काळी टोपी आणि काळी फीत लावून राज्य सरकारचा निषेध करणार; घरकुल योजनेच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलनाचा निर्धार…

प्रतिनिधी – सोलापूर
समाजातील वंचित, अन्यायग्रस्त आणि पीडित घटकांच्या प्रश्नांना आपल्या लेखणीतून वाचा फोडणाऱ्या पत्रकारांनाच आज स्वतःच्या हक्काच्या घरासाठी संघर्ष करावा लागत आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील स्वतःच्या मालकीची पक्की घरे नसलेल्या पत्रकारांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल मिळावे, या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक झाली आहे. या मागणीसाठी येत्या मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळी पाडव्याच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी टोपी आणि काळी फीत लावून धरणे आंदोलन करण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून समाजाप्रती असलेले दायित्व निभावण्याचा वसा आहे. मात्र, सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक पत्रकार आजही भाड्याच्या घरात राहत आहेत. अल्प मानधन आणि जाहिरातींच्या माध्यमातून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न यामुळे अनेक पत्रकारांना स्वतःच्या मालकीचे घर घेणे आर्थिकदृष्ट्या शक्य झालेले नाही. कोरोना महामारीच्या कठीण काळात स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेची पर्वा न करता पत्रकारांनी शासनाचे आदेश, सूचना आणि महत्त्वाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. समाजासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पत्रकारांच्या निवासाचा प्रश्न मात्र अद्याप प्रलंबित असल्याची भूमिका समितीने मांडली आहे.
निवेदन देऊनही कार्यवाही नसल्याचा आरोप
स्वतःच्या मालकीची घरे नसलेल्या पत्रकारांसाठी घरकुल योजना राबविण्यात यावी, या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीने दि. १८ जून २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले होते. त्यानंतर दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे येथे विभागीय आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन पत्रकारांना हक्काची घरे मिळावीत, यासाठी स्वतंत्र घरकुल योजना राबविण्याची मागणी करण्यात आली होती.
समितीच्या निवेदनाची दखल घेत पुणे विभागीय आयुक्तांनी पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण गृहनिर्माण विभागाच्या संचालकांना पत्र पाठविले होते. मात्र, त्यानंतरही या मागणीवर अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा आरोप पत्रकार सुरक्षा समितीने केला आहे. पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लागावा आणि राज्य सरकारचे लक्ष वेधले जावे, यासाठी समितीने यापूर्वीही विविध आंदोलने केली आहेत.
दिवाळी पाडव्याला आंदोलनाचा निर्धार
पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा आणि पात्र पत्रकारांसाठी घरकुल योजना राबविण्याबाबत शासनाने ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी दि. १० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या वेळी काळी टोपी आणि काळी फीत लावून शासनाच्या कथित दिरंगाईचा निषेध व्यक्त केला जाणार आहे, अशी माहिती समितीच्या बैठकीत देण्यात आली.
या बैठकीस पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ. राम हुंडारे, प्रभारी कार्यकारी जिल्हाध्यक्ष बसवराज हमाले, जिल्हा संघटक अरुण सिडगिद्दी, जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे, शहराध्यक्ष आन्सर तांबोळी, कार्याध्यक्ष राजू वग्गू, समन्वयक लक्ष्मण सुरवसे, सचिव रमेश दग्गारी, संघटक गणेश निंबाळकर, दत्तात्रय बनसोडे, सुफी शेख, जैद बागवान, अक्षय देवकुळे, व्यंकटेश सुंचू यांच्यासह अन्य पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

















