टेंभुर्णीत एमडी ड्रग्स, तर रांजणीमध्ये ५ किलो ६२० ग्रॅम गांजा हस्तगत; वर्षभरात अडीच कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी – सोलापूर,
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात कारवाई करत दोन वेगवेगळ्या प्रकरणांत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. टेंभुर्णी येथे ५.५२ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स, तर पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथे ५ किलो ६२० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या दोन्ही कारवायांमध्ये वाहनांसह एकूण २५ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
टेंभुर्णीत कारवाई; एमडी ड्रग्ससह कार जप्त
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली २१ ते २२ ऑक्टोबर २०२६ दरम्यान कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुर्डुवाडी पुलाजवळ किआ सेल्टोस कारमधून अंमली पदार्थ विक्रीसाठी आणले जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित कार अडवली. तपासणीदरम्यान गौतम अजित भोसले (वय ३८, रा. वेणेगाव, ता. माढा, जि. सोलापूर) याच्याकडून ५.५२ ग्रॅम एमडी ड्रग्स, दोन मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. कारसह या मुद्देमालाची एकूण किंमत २१ लाख ६१ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासादरम्यान आरोपीने अन्य दोन साथीदारांसह दुसऱ्या किआ सेल्टोस कारमधून ओडिशा येथे अंमली पदार्थ आणण्यासाठी गेल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी नमूद केले. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रांजणी शिवारात सव्वापाच किलोहून अधिक गांजा जप्त
दुसऱ्या कारवाईत पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावाच्या शिवारात पंकज मोहन दांडगे याच्या घराशेजारील गट क्रमांकाच्या शेतात पोलिसांनी तपासणी केली. यावेळी कापून बांधून ठेवलेला ५ किलो ६२० ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त गांजाची किंमत ३ लाख ८१ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरू आहे.
वर्षभरात ९१ गुन्हे; २ कोटी ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने १ जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत एनडीपीएस कायद्यांतर्गत एकूण ९१ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवायांमध्ये २५ जणांकडून २ कोटी ५१ लाख २७ हजार १०० रुपयांचे अंमली पदार्थ आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच अंमली पदार्थ सेवनप्रकरणी ६८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना माहिती द्या
तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी आणि अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून विविध कारवाया करण्यात येत आहेत. अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

















