महिला स्वयंसहायता गटांच्या उत्पादनांना मिळणार बाजारपेठ; नागरिकांनी खरेदी करून महिलांना प्रोत्साहन देण्याचे कुशल जैन यांचे आवाहन…

प्रतिनिधी – सोलापूर
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आवारात ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव-२०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २ व ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.
या महोत्सवाचे उद्घाटन २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंग केदार, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, समाजकल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते आदी उपस्थित राहणार आहेत.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेटवस्तू, फराळाचे पदार्थ आणि विविध सजावटीच्या साहित्याला मोठी मागणी असते. ही संधी लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील एकूण २५ स्वयंसहायता समूहांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यामध्ये सुकामेवा, दिवाळी फराळ, हस्तकला साहित्य, पणत्या, आकाशकंदील तसेच महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचा समावेश असेल. फटाके वगळता दिवाळीसाठी आवश्यक असलेले विविध साहित्य या महोत्सवात उपलब्ध होणार आहे.
ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या उत्पादनांच्या विक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळावे, त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन मिळावे आणि महिला बचत गटांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. त्याचबरोबर सोलापूर शहर व परिसरातील नागरिकांना दर्जेदार वस्तू योग्य दरात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, लेखाधिकारी शुभांगी देशपांडे, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव, मीनाक्षी मडीवळी, दयानंद सरवळे, अनिता माने, शितल म्हता आदी या उपक्रमाच्या आयोजनात सहभागी आहेत.
महिलांच्या उत्पादनांना पाठबळ द्या!
“उमेद अभियानांतर्गत आयोजित रुक्मिणी दिवाळी महोत्सवात ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तू, फराळ साहित्य, आकाशकंदील, पणत्या आणि इतर दिवाळी साहित्याची खरेदी करून महिला बचत गटांना पाठबळ द्यावे,” असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांनी केले आहे.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















