यावली शाळा ‘ड’ वर्गातून ‘क’ किंवा ‘ब’ वर्गात आणण्यासाठी शिक्षकांशी संवाद; अनगर आरोग्य केंद्राची पाहणी, चिंचोली काटी येथे घरकुल लाभार्थ्याची सदिच्छा भेट

प्रतिनिधी – मोहोळ
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 च्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी मोहोळ तालुक्याचा दौरा करून शैक्षणिक गुणवत्ता, आरोग्य सुविधा आणि घरकुल योजनांच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

या दौऱ्यात त्यांनी यावली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची पाहणी केली. सध्या ‘ड’ वर्गात असलेल्या या शाळेचा दर्जा उंचावून ‘क’ किंवा ‘ब’ वर्गात समावेश करण्याच्या दृष्टीने त्यांनी शिक्षकांशी सविस्तर चर्चा केली. शाळेच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना, शैक्षणिक नियोजन, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि उपलब्ध सुविधांमध्ये सुधारणा करण्याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशीही थेट संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या ग्रुप ॲक्टिव्हिटी, विविध शैक्षणिक उपक्रम आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रियेची पाहणी केली. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि कृतीतून शिक्षण घेण्याची आवड निर्माण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
त्यानंतर अनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी ऑपरेशन थिएटर, औषधसाठा, प्रयोगशाळेतील तपासणी सुविधा तसेच विविध विभागांची तपासणी केली. आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून दैनंदिन कामकाज, उपलब्ध सुविधा आणि भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांना दर्जेदार व वेळेत आरोग्य सेवा मिळावी, यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधितांना दिल्या.यानंतर चिंचोली काटी येथे घरकुल योजनेच्या लाभार्थ्याच्या घरी सदिच्छा भेट देऊन घरकुलाची पाहणी केली. घरकुल बांधकामाची सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा आणि शासकीय योजनेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे की नाही, याची माहिती घेतली.

या दौऱ्यावेळी मोहोळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी तेजश्री गायकवाड, गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक, विस्तार अधिकारी नागसेन कांबळे आदी उपस्थित होते.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर.
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















