स्वतःच्या खिशातून केली आर्थिक मदत; प्रशासकीय जबाबदारीसोबत जपली माणुसकीची नाळ!

प्रतिनिधी – सोलापूर
शासकीय अधिकारी म्हटले की प्रशासकीय कामकाज आणि जबाबदाऱ्या डोळ्यासमोर येतात. मात्र, याच जबाबदाऱ्या पार पाडताना सामाजिक संवेदनशीलता आणि माणुसकी जपणारे अधिकारीही समाजात आहेत. याचा प्रत्यय दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी केलेल्या मदतीतून आला आहे. अपघातामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या तांदूळवाडी येथील ई-पीक पाहणी सहाय्यक नारायण परमेश्वर बोकडे यांना त्यांनी स्वतःच्या खिशातून वैयक्तिक आर्थिक मदत करून आधार दिला.

नारायण परमेश्वर बोकडे यांच्याकडे दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदूळवाडी गावाची ई-पीक पाहणी सहाय्यक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी कर्तव्य बजावत असताना त्यांचा दुचाकी अपघात झाला. या अपघातात त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून पायात रॉड बसविण्यात आला आहे. या दुखापतीमुळे त्यांना कामापासून दूर राहावे लागले. परिणामी, उत्पन्नावर परिणाम होऊन त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या.

ही बाब मुळेगावचे ई-पीक पाहणी सहाय्यक अजमेर शेख यांच्या निदर्शनास आली. त्यांनी स्वतः तहसीलदार किरण जमदाडे यांची भेट घेऊन बोकडे यांच्या परिस्थितीची माहिती दिली. त्यावेळी तहसीलदारांनी मदतीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.
त्यानंतर शुक्रवारी नारायण बोकडे यांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार किरण जमदाडे यांची भेट घेतली. त्यांच्या अडचणी समजून घेत जमदाडे यांनी स्वतःच्या खिशातून वैयक्तिक आर्थिक मदत देत त्यांना दिलासा दिला. अडचणीच्या काळात मिळालेल्या या मदतीमुळे बोकडे यांना मोठा आधार मिळाला आहे.
मदत मिळाल्यानंतर नारायण बोकडे यांनी व्यक्त केली कृतज्ञता!
अपघातामुळे माझ्यावर कठीण परिस्थिती ओढवली होती. अशा वेळी माझे सहकारी अजमेर शेख यांनी तहसीलदार साहेबांची भेट घेऊन माझ्या परिस्थितीची माहिती दिली. आज मी स्वतः तहसील कार्यालयात गेलो असता तहसीलदार किरण जमदाडे साहेबांनी माझ्या अडचणी समजून घेत वैयक्तिक आर्थिक मदतीचा हात दिला. त्यांच्या या सहकार्यामुळे मला मोठा आधार मिळाला असून त्यांच्या माणुसकीबद्दल मी मनापासून आभारी आहे, अशी भावना नारायण बोकडे यांनी व्यक्त केली.
अधिकारीपदापेक्षा माणुसकी मोठी!
संकटाच्या काळात एखाद्याच्या अडचणी समजून घेऊन त्याला मदतीचा हात देणे हीच खऱ्या माणुसकीची ओळख आहे. तहसीलदार किरण जमदाडे यांनी केलेले हे सहकार्य केवळ आर्थिक मदत नसून सहवेदना, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरले आहे. त्यांच्या या कृतीमुळेप्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील माणुसकीचे नाते अधोरेखित झाले आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















