
प्रतिनिधी – अंत्रोळी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे मंद्रूप पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकातील पोलीस कॉन्स्टेबल विशाल सावंत यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना विशाल सावंत यांनी शिक्षक आणि पालक यांच्यात नियमित संवाद व आंतरक्रिया होणे गरजेचे असल्याचे सांगितले. अशा संवादातून शाळेचा तसेच गावाचा विकास साधण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये आणि स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. अनोळखी व्यक्तींशी बोलू नये, त्यांच्याकडून कोणतेही खाद्यपदार्थ स्वीकारू नयेत तसेच अनोळखी व्यक्तीच्या वाहनावर बसू नये, अशा महत्त्वपूर्ण सुरक्षिततेच्या सूचना त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.
शाळेतील विद्यार्थी हे देशाचे आणि गावाचे भविष्य असून त्यांनी भविष्यात मोठ्या पदांवर कार्यरत होऊन गावाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. यासोबतच दररोज शाळेतील शिस्त, स्वच्छता, नियमित गणवेश आणि अभ्यास या बाबींना महत्त्व देण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक युवराज राठोड यांनी शाल देऊन पोलीस कॉन्स्टेबल विशाल सावंत यांचा सत्कार केला. यावेळी गावातील समाजसेविका कल्पना सोनकवडे, शिक्षक श्रीरंग बनसोडे, नागनाथ म्हमाणे, मीनाक्षी राठोड, पुष्पा बनसोडे, सुषमा कुंभार तसेच पालक उपस्थित होते.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















