ग्रामीण आरोग्य सेवेला मिळणार बळ; NQAS मानांकनामुळे गुणवत्तापूर्ण आणि सुरक्षित आरोग्यसेवेला प्रोत्साहन
प्रतिनिधी – सोलापूर
सोलापूर जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरीची नोंद झाली असून, जिल्ह्यातील तब्बल ५० आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (NQAS) अंतर्गत मानांकन प्राप्त झाले आहे. ग्रामीण आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब असून, जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये गुणवत्तापूर्ण, सुरक्षित आणि रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (National Quality Assurance Standards) राबविण्यात येतात. या मानांकनासाठी आरोग्य संस्थेतील स्वच्छता, रुग्ण सुरक्षा, संसर्ग नियंत्रण, औषध व उपकरण व्यवस्थापन, प्रशासन, सेवा वितरण आणि रुग्ण समाधान अशा विविध बाबींचे सखोल मूल्यांकन केले जाते.
या निकषांची पूर्तता करत सोलापूर जिल्ह्यातील ५० आयुष्मान आरोग्य मंदिरांनी राष्ट्रीय मानांकन मिळविले आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना गावपातळीवरच अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
राष्ट्रीय मानांकन प्राप्त आरोग्य संस्थांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या नियमानुसार गुणवत्ता प्रोत्साहन निधी मिळण्यास पात्रता असते. या निधीचा उपयोग आरोग्य संस्थांच्या पायाभूत सुविधा आणि रुग्णांसाठीच्या सोयीसुविधा अधिक सक्षम करण्यासाठी करता येणार आहे. तसेच औषधसाठा, उपकरणे, अभिलेख व्यवस्थापन आणि आरोग्यसेवेच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
या यशामागे पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते, कृषी व संवर्धन समिती सभापती रामप्पा चिवटशेट्टी, महिला व बालकल्याण समिती सभापती अमृता वाघे यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या नेतृत्वाखाली आणि उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी साध्य झाली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव आणि जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक निखिल फताटे यांच्यासह संपूर्ण आरोग्य विभागाच्या टीमने यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांचेही योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
चौकट : उर्वरित आरोग्य संस्थांनाही मानांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील!
सोलापूर जिल्ह्यातील ५० आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय NQAS मानांकन मिळणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यातील उर्वरित सर्व आरोग्य संस्थांनीही हे मानांकन प्राप्त करावे, यासाठी आरोग्य विभागामार्फत सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुरक्षित आणि रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















