५० टक्के सवलतीत लाडक्या बहिणींना शिलाई मशीन; महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न.

प्रतिनिधी – सांगोला
शिवसेनेचे उपनेते तथा सांगोल्याचे माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी १० हजार शिलाई मशीन वाटपाचा संकल्प करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ५० टक्के सवलतीच्या दरात शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सांगोला येथे शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.

महिलांना केवळ शासकीय योजनांचा लाभ मिळण्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. शिलाई मशीनच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या व्यवसाय सुरू करता येणार असून, कपडे शिवणे, दुरुस्ती करणे तसेच विविध प्रकारची शिलाई कामे करून त्यांना उत्पन्नाचे साधन निर्माण करता येणार आहे. त्यामुळे महिलांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील, सांगोला तालुका शिवसेनाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे, शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख श्री. राजकुमार हिवरकर-पाटील यांच्यासह सांगोला शहरातील आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच तसेच लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


यावेळी व्यासपटावर मनोगत व्यक्त करताना शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख श्री. राजकुमार हिवरकर-पाटील यांनी महिलांना शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे महिला सक्षमीकरणाला आणि स्वयंरोजगाराला चालना मिळेल, असे मत व्यक्त केले. महिलांना रोजगाराची संधी मिळाल्यास त्या स्वतःच्या कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण होण्यास मदत होते, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच रवीभाऊ मेटकरी यांनी केले होते. कार्यक्रमाला ओबीसी महासंघाचे भीमराव घुसणार, जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे, तालुकाप्रमुख तानाजीराव भोळे-पाटील यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जाहीर करण्यात आलेल्या १० हजार शिलाई मशीन वाटपाच्या या संकल्पामुळे सांगोला तालुक्यातील महिलांना स्वयंरोजगाराची नवी संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. महिलांचे आर्थिक स्वावलंबन, कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती या दृष्टीने या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















