
अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या कुटुंबातील मुलीचे उल्लेखनीय यश; मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर गावाचा नावलौकिक…
प्रतिनिधी – मंगळवेढा
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, हे मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर गावच्या भूमी वर्गंटी या तरुणीने सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात तिची वनरक्षकपदी निवड झाली असून, तिच्या या यशामुळे कुटुंबासह गावाचा आणि समाजाचा अभिमान उंचावला आहे.
भूमीचा यशापर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. घरची परिस्थिती अठरा विश्व दारिद्र्याची, वडील अशिक्षित आणि कुटुंबात शिक्षणासाठी आवश्यक सुविधा व आर्थिक पाठबळाची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीत तिने आपल्या ध्येयाचा पाठपुरावा सुरू ठेवला. अनेक अडचणींचा सामना करत तिने अभ्यासात सातत्य राखले. अपयशाची चिंता न करता जिद्द आणि चिकाटीने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि तिची वनरक्षकपदी निवड झाली.
भूमीच्या या यशामागे भटके विमुक्त विकास परिषद, महाराष्ट्र प्रदेश यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या ज्या-ज्या व्यक्तींनी तिला मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि सहकार्य केले, त्या सर्वांचे तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनापासून आभार मानले.
यावेळी भूमी म्हणाली की, “माझ्या समाजातून वनरक्षकपदी निवड झालेली मी पहिली मुलगी असल्याचा मला मनस्वी अभिमान आहे. माझ्या या यशामागे आई-वडिलांचे आशीर्वाद, मार्गदर्शकांचे सहकार्य आणि माझे सातत्यपूर्ण परिश्रम आहेत. मी अपयशाची चिंता न करता अभ्यास सुरू ठेवला. जिथे जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक परिश्रम असतात, तिथे यश निश्चितच मिळते.”
तसेच माझ्या समाजातील इतर मुलींनीही माझ्या यशातून प्रेरणा घ्यावी, शिक्षणाला महत्त्व द्यावे आणि परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी आपले ध्येय सोडू नये, असे आवाहनही भूमीने केले.
भूमी वर्गंटी हिचे यश हे केवळ एका कुटुंबाचे यश नसून समाजातील इतर मुलींसाठीही प्रेरणादायी उदाहरण ठरणार आहे. आर्थिक परिस्थिती किंवा सामाजिक अडचणी या यशाच्या मार्गातील अडथळे ठरू शकत नाहीत, हे तिने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















