इयत्ता दुसरीतील चिमुकल्या श्रद्धा केवटेने साबणनिर्मितीची माहिती सांगत वेधले मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे लक्ष; विद्यार्थ्यांचे कौतुक करत प्रमाणपत्र देऊन केले प्रोत्साहन.

प्रतिनिधी – सोलापूर
कल्पकता, जिद्द आणि कृतीशीलतेच्या जोरावर विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना कशी संधी मिळू शकते, याचे सुंदर उदाहरण दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील जिल्हा परिषद मुलांच्या व मुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी घालून दिले. दिवाळी सणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून विविध आकर्षक आणि उपयुक्त वस्तू तयार करत सर्जनशील दिवाळी साजरी केली.

पंचायत समिती दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी सुगंधी उटणे, शंभर टक्के केमिकलविरहित हर्बल साबण, आकर्षक पणत्या, आकाशकंदील, पेंटिंग तसेच हँडमेड चॉकलेट तयार केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांसोबतच त्यांच्यातील कल्पकता, आत्मविश्वास आणि प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची वृत्ती दिसून आली.
या उपक्रमातील विशेष आकर्षण ठरली ती इयत्ता दुसरीत शिकणारी चिमुकली विद्यार्थिनी श्रद्धा केवटे! तिने स्वतः तयार केलेल्या हर्बल साबणाची निर्मिती प्रक्रिया, त्यासाठी वापरण्यात आलेले घटक आणि साबणाचे वैशिष्ट्य याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्यासमोर आत्मविश्वासाने माहिती दिली. एवढ्या लहान वयात विषयाची समज आणि सादरीकरणातील आत्मविश्वास पाहून कुशल जैन यांनी श्रद्धासह सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले सुगंधी उटणे आणि हर्बल साबण मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना दिवाळीच्या शुभेच्छांसह भेट दिले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन दिले. तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांनाही विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू भेटस्वरूपात देण्यात आल्या.
या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुहासिनी शेंडे आणि प्रकाश कुंभार यांनी विशेष पुढाकार घेतला. यावेळी गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार, विस्तार अधिकारी मल्लिनाथ स्वामी, गुरुबाळ सनके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सूर्यकांत भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल जाधव आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता स्वतःच्या हातांनी विविध वस्तू तयार करण्याचा अनुभव घेतला. या उपक्रमामुळे त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळण्यासोबतच स्वावलंबन, कौशल्य विकास आणि उद्योजकतेची बीजे बालवयातच रुजण्यास मदत झाली आहे.
जलता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240















