शाळांच्या प्रत्यक्ष भेटीतून शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांचे अध्यापन व भौतिक सुविधांचा घेणार आढावा; सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांचा पुढाकार…

प्रतिनिधी – सोलापूर
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासह विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी सोलापूर जिल्ह्यात अभिनव शाळा तपासणी पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत याबाबत पुढाकार घेत विविध महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या शिक्षण व्यवस्थेत गुणवत्तापूर्ण सुधारणा घडवून आणण्यासाठी हा प्रयत्न करण्यात येत आहे.तालुकास्तरावर सध्या राबविण्यात येत असलेला अभिनव शाळा तपासणी पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात लागू करण्याची सूचना सभापती केदार-सावंत यांनी केली. या तपासणीमध्ये केवळ कागदपत्रांची पडताळणी न करता प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांचे अध्यापन, शाळांमधील भौतिक सुविधा आणि शैक्षणिक वातावरणाची पाहणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. शाळा तपासणी ही केवळ औपचारिकता न राहता विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रभावी ठरावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

तसेच, शिष्यवृत्ती परीक्षेची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने सध्या चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांपुरती मर्यादित असलेली संधी सर्व इयत्तांतील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होण्यासह शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळेल, असा उद्देश आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचा मालकी हक्क जिल्हा परिषदेच्या नावावर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. या प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी समितीसमोर मांडून त्यावर योग्य तोडगा काढण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
दरम्यान, जवाहरलाल नेहरू मुलांचे वसतिगृह आणि सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह येथील भौतिक सुविधांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुविधायुक्त आणि चांगल्या दर्जाची निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या वसतिगृहांचा आढावा घेण्यात येणार आहे.
या बैठकीस आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत, समिती सदस्य चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव, श्रुती भोरगुंडे, सुषमा नारनवर, विजयराज डोंगरे, शिवराज म्हेत्रे, प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे, शिक्षणाधिकारी (योजना) सुजित शिंदे, उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240















