कै. हणमंतप्पा कट्टीमनी यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद बीटवरील पत्रकारांना साखरेचे वाटप; सामाजिक बांधिलकीचा जपला वारसा.

प्रतिनिधी – सोलापूर
दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांचा आणि रोषणाईचा सण नसून माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा उत्सव आहे. याच भावनेतून मुख्याध्यापक महांतेश कट्टीमनी यांनी आपले वडील दलित मित्र कै. हणमंतप्पा कट्टीमनी यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद बीटवरील पत्रकारांना दिवाळी भेट देत सामाजिक बांधिलकीचा अनोखा परिचय करून दिला.

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. समाजातील विविध प्रश्न, जनतेच्या समस्या, शासकीय योजनांची माहिती तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणारी विकासकामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकार सातत्याने प्रयत्नशील असतात. स्वतःच्या अडचणी बाजूला ठेवून समाजहितासाठी कार्य करणाऱ्या पत्रकारांच्या योगदानाची जाणीव ठेवत कट्टीमनी यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

विशेष म्हणजे, कट्टीमनी परिवाराच्या वतीने जिल्हा परिषद बीटवरील पत्रकार बांधवांना प्रत्येकी पाच किलो साखरेचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम केवळ दिवाळी भेट देण्यापुरता मर्यादित नसून वडिलांच्या स्मृती जपण्याबरोबरच त्यांनी निर्माण केलेल्या समाजसेवेच्या वारशाला पुढे नेण्याचा एक प्रेरणादायी प्रयत्न ठरला आहे.
वडिलांच्या स्मरणार्थ समाजातील विविध घटकांशी आपुलकीचे नाते जोडणे आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणे, हीच खऱ्या अर्थाने त्यांना वाहिलेली आदरांजली असल्याची भावना या उपक्रमातून व्यक्त झाली.या उपक्रमाबद्दल जिल्हा परिषद बीट पत्रकार संघ, सोलापूर यांच्यावतीने मुख्याध्यापक महांतेश कट्टीमनी आणि कट्टीमनी परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन करून आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी पत्रकार बांधवांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “कै. हणमंतप्पा कट्टीमनी यांनी समाजसेवेचा जो वारसा निर्माण केला, तो त्यांचे सुपुत्र मुख्याध्यापक महांतेश कट्टीमनी समर्थपणे पुढे चालवत आहेत. पत्रकारांच्या सन्मानाची आणि आपुलकीची जी भावना अपेक्षित असते, ती त्यांनी स्वतःच्या पुढाकारातून कृतीतून दाखवून दिली.”
पद, प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धीपेक्षा माणुसकीला महत्त्व देणारे असे उपक्रम समाजात सकारात्मकतेचा संदेश देतात. वडिलांच्या स्मृतींना कृतीतून अभिवादन करत पत्रकारांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या महांतेश कट्टीमनी यांचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून, सामाजिक बांधिलकी जपण्याची प्रेरणा देणारा ठरला आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















