आत्मनिर्भर वस्ती स्तर संघाच्या अध्यक्षा सुनीता दळवी यांचा पुढाकार; तीन वर्षांपासून सीआरपी महिलांचे मानधन थकीत.

प्रतिनिधी – सोलापूर
महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात बचत गटांना निधी आणि विविध लाभ मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भर वस्ती स्तर संघाच्या अध्यक्षा सुनीता दळवी यांनी महिला बचत गटांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महानगरपालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांना निवेदन सादर केले.
आत्मनिर्भर वस्ती स्तर संघांतर्गत एकूण दहा महिला बचत गट कार्यरत आहेत. या बचत गटांच्या माध्यमातून महिला आर्थिक स्वावलंबनासाठी प्रयत्न करीत आहेत. तसेच बचत गटांमधील काही महिला सीआरपी (समुदाय संसाधन व्यक्ती) म्हणून काम पाहतात. मात्र, मागील तीन वर्षांपासून त्यांच्या कामाचे मानधन मिळाले नसल्याने त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
महिला बचत गटांना शासनाच्या योजनांमधून आर्थिक सहाय्य मिळावे, बचत गटांना आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच सीआरपी महिलांचे थकीत मानधन तातडीने अदा करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यामध्ये महिला बचत गटांना फिरता निधी उपलब्ध करून देणे, सीआरपी महिलांचे तीन वर्षांपासून थकीत असलेले मानधन अदा करणे आणि बचत गटांना मिळणाऱ्या कर्जावर सबसिडी मंजूर करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. संबंधित विभागाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली.
यावेळी वस्ती स्तर संघाच्या अध्यक्षा सुनीता दळवी, माजी महापौर नलिनीताई चंदिले, श्रुतिका काळे, रूपाली चराटे, मीना खंडागळे, इंदुमती भोसले, राजश्री अंकुल, आशा फुलवर, भाग्यश्री भोसले आदी महिला उपस्थित होत्या.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240















