
प्रतिनिधी – मंद्रूप
मंद्रूप येथील आठवडा बाजारात दर आठवड्याला नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग आणि रस्त्यांवरील अतिक्रमणाचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) गणेश शिंदे यांनी आठवडा बाजारात अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्या अचानक आगमनामुळे बाजारपेठेत एकच धावपळ उडाली.
यावेळी त्यांनी बाजारपेठेतील मुख्य रस्ते, चौक आणि दुकानांसमोरील गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करून वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. चुकीच्या ठिकाणी वाहने उभी करणे, वाहतुकीला अडथळा निर्माण करणे तसेच बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. काही वाहनचालकांना समजही देण्यात आली.
आठवडा बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी DYSP गणेश शिंदे यांनी व्यापाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. दुकानांसमोर अतिक्रमण करू नये, रस्ते मोकळे ठेवावेत आणि ग्राहकांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
यावेळी नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी निर्भयपणे खरेदी करण्याचे आवाहन केले. बाजारपेठेत किंवा परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कायमस्वरूपी वाहतूक नियोजनाची अपेक्षा!
DYSP गणेश शिंदे यांच्या पाहणीमुळे मंद्रूप आठवडा बाजारातील वाहतूक आणि अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. केवळ आठवडा बाजाराच्या दिवशीच नव्हे, तर नियमितपणे वाहतूक नियोजन करावे, बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण ठेवावे आणि बाजारपेठेतील रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवावेत, अशी अपेक्षा नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















