
प्रतिनिधी-अक्कलकोट
आषाढी एकादशीचे औचित्य साधून शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी श्री तारा माता प्राथमिक शाळेत पारंपरिक व भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

या कार्यक्रमाला श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे शालेय समितीचे चेअरमन मा. श्री अमर पाटील, संस्थेचे विश्वस्त मा. श्री प्रकाश पडवळकर तसेच नागनाथ प्रशाला, कुरनूर येथील सेवानिवृत्त शिक्षक मा. श्री स्वामीराव सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात पालखीतील माऊलींच्या पूजनाने व श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या आरतीने झाली. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी पालखी खांद्यावर घेत दिंडीला प्रारंभ केला. विद्यार्थ्यांनी हरिनामाच्या गजरात टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर दिंडीची शोभा वाढवली. काही शिक्षिकांनीही माऊलींची भक्तिगीते सादर करून वातावरण भक्तिमय केले.



यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, मुक्ताबाई आदी संतांच्या आकर्षक वेशभूषा साकारल्या होत्या. वारकरी वेशातील विद्यार्थ्यांच्या हातात भगवे झेंडे, तर विद्यार्थिनींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन असल्याने दिंडीला पारंपरिक आणि लोभस स्वरूप प्राप्त झाले.शाळेच्या प्रांगणातून निघालेली पालखी श्री विठ्ठल मंदिरात पोहोचली. मंदिर परिसरात विद्यार्थ्यांनी भक्तिगीते, भजन, अभंग, रिंगण, फुगड्या आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने आणि भक्तिरसाने दुमदुमून गेला.

या प्रसंगी शीतल मोरे मॅडम, अंजली जाधव मॅडम, आरिफ शेख सर, प्रशांत संगोळगी सर, शीतल गोडसे मॅडम तसेच पुष्पा हरवाळकर मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.















