
प्रतिनिधी -सोलापूर
शारीरिक मर्यादा कधीही यशाच्या आड येत नाहीत, याचे जिवंत उदाहरण एका दृष्टीहीन विद्यार्थ्याने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. दृष्टी नसतानाही आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत तो आत्मविश्वासाने दैनंदिन व्यवहार पूर्ण करत आहे.


हा विद्यार्थी आपल्या मित्राच्या सहकार्याने सायकलवरून प्रवास करतो. विशेष म्हणजे त्याच्या मित्रालाही कमी दिसते, तरीही दोघे एकमेकांचा आधार बनून शिक्षण आणि दैनंदिन जीवनाचा प्रवास यशस्वीपणे करत आहेत.
अलीकडेच एका फोटो स्टुडिओमध्ये घडलेली घटना अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. झेरॉक्सचे ८५ रुपये देण्याची वेळ आली असता, दृष्टीहीन असूनही विद्यार्थ्याने आपल्या मोबाईलचा कुशलतेने वापर करून संबंधित व्यक्तीला अवघ्या काही क्षणांत ऑनलाईन पेमेंट केले. त्याचा आत्मविश्वास, तंत्रज्ञानावरील प्रभुत्व आणि व्यवहारातील अचूकता पाहून उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित झाले.
या विद्यार्थ्याने सिद्ध करून दाखवले की, अपंगत्व हे यशाचे अडथळे नसून जिद्द, आत्मविश्वास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. अशा विद्यार्थ्यांची प्रेरणादायी वाटचाल समाजातील प्रत्येकासाठी आदर्श ठरत आहे.















