
प्रतिनिधी – सोलापूर
शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाची विशेष मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ओबीसी शिवसेना जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली जिल्ह्यात आतापर्यंत १० हजारांहून अधिक महिलांना ५० टक्के अनुदानित दरात शिलाई मशीनचे वाटप करून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे.

या अभियानाचा पुढचा टप्पा म्हणून उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिला जिल्हाप्रमुख उमा माळी यांच्या नियोजनातून पार पडलेल्या या कार्यक्रमात ५०० हून अधिक गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. तसेच चौथ्या टप्प्यातील सुमारे २,५०० हून अधिक शिलाई मशीनचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज तसेच हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे, ओबीसी शिवसेना जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख तानाजीराव भोळे पाटील, माळशिरस तालुकाप्रमुख आकाश नाळे, वैशालीताई साठे, नंदकुमार गवळी, सरपंच समाधान रोकडे (पडसाळी), उपसरपंच अनिल माळी (वडाळा), नागेश बापू पवार, रशिद शेख, मनोज साठे, सुधीर सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना राजकुमार हिवरकर पाटील म्हणाले, “महिलांना केवळ आर्थिक मदत देणे हा उद्देश नसून त्यांच्या हाताला रोजगार देऊन त्यांना स्वाभिमानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. उमा माळी यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे शेकडो महिलांपर्यंत हा उपक्रम प्रभावीपणे पोहोचला आहे.”

ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे म्हणाले, “राजकुमार हिवरकर पाटील यांची दूरदृष्टी असलेली ही संकल्पना ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणारी आहे. वडाळ्यात ५०० हून अधिक महिलांना शिलाई मशीन मिळाल्याने त्यांच्या स्वावलंबनाचा मार्ग अधिक मजबूत झाला आहे.”

यावेळी शिलाई मशीन मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यक्रमास शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. राजकुमार हिवरकर पाटील यांच्या संकल्पनेला उमा माळी यांच्या प्रभावी आयोजनाची जोड मिळाल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्योती भाले, उमा नागेश अकोलकर-माळी, बबन माळी आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीडिया व राजकीय सल्लागार आकाश नाळे यांनी केले. सूत्रसंचालन तालुकाप्रमुख ज्योती भाले यांनी केले, तर आभार प्रदर्शन महिला जिल्हाप्रमुख उमा अकोलकर-माळी यांनी मानले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना राजकुमार हिवरकर – पाटील यांनी भविष्यात ग्रामीण भागातील मुलींसाठी शिलाई मशीनप्रमाणेच सायकल वाटपाचा उपक्रमही राबविण्याचा संकल्प जाहीर केला.
जनता संघर्ष न्यूज सोलापूर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क–9579838240
















