प्रतिनिधी – सोलापूर
सोलापूर शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, संशोधन वृत्तीला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. लक्ष्मण करळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उत्साहात करण्यात आले.
यावेळी तुकाराम चंद्रकांत साळुंखे, क्रांतिवीर शिवराम महिंद्रकर, डॉ. अशोक सोरगावी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी, शाळेचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी आणि शाळेच्या मार्गदर्शिका मीना पारखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे डॉ. लक्ष्मण करळे यांनी विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून आपल्या संशोधन वृत्तीला चालना द्यावी, तसेच अशा विज्ञान प्रदर्शनांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी आणि संस्थेच्या सचिवा सौ. वर्षाताई विभुते यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संशोधनपर कल्पना व प्रयोगांचे कौतुक केले.या विज्ञान प्रदर्शनात शाळेतील तब्बल ४९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बालवैज्ञानिकांनी अंतराळ मोहिमा, मंगळ ग्रह व चंद्र मोहीम, भविष्यातील रोबोटिक्स तंत्रज्ञान तसेच स्वयंचलित उपकरणांवर आधारित एकापेक्षा एक सरस आणि आकर्षक जिवंत मॉडेल्स सादर केली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने, आत्मविश्वासाने आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थिनी कु. सान्वी चव्हाण व संज्ञा मोहिते यांनी केले. प्रदर्शनाला शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. “विज्ञान केवळ पुस्तकात नसून ते आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे,” याची अनुभूती या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांसह पालकांनाही मिळाली, अशी प्रतिक्रिया उपस्थित पालकांनी व्यक्त केली.
विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने साकारलेल्या विविध रोबोट्सच्या प्रभावी सादरीकरणाने प्रदर्शनाची उत्साहात सांगता झाली.















