
प्रतिनिधी -अक्कलकोट, दि. १४ ऑगस्ट २०२६
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित श्री स्वामी समर्थ शिशु विकास मंदिरातील विद्यार्थ्यांना देवस्थानच्या वतीने सालाबादप्रमाणे मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. गणवेश वितरणाचा कार्यक्रम समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे तसेच मंदिर समितीचे बांधकाम अभियंता नवनाथ बनकर यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना नवनाथ बनकर यांनी सांगितले की, देवस्थानचे तत्कालीन माजी चेअरमन कै. कल्याणराव (बाळासाहेब) इंगळे यांनी २९ वर्षांपूर्वी अक्कलकोट शहरातील गरीब व गरजू कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, या उद्देशाने श्री स्वामी समर्थ शिशु विकास मंदिराची स्थापना केली. या माध्यमातून बालकांना मोफत शिक्षणाबरोबरच दरवर्षी शैक्षणिक साहित्य व गणवेश उपलब्ध करून दिला जातो. या उपक्रमातून देवस्थान समितीने आपली शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी सातत्याने जपली आहे.सध्या या विद्यामंदिरात सुमारे २८७ बालके मोफत शिक्षणाचा लाभ घेत आहेत. आधुनिक काळातील इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन गेल्या ११ वर्षांपासून विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचेही शिक्षण दिले जात आहे. चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षित शिक्षकवृंद यामुळे दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांचा कल वाढत आहे. भविष्यात विद्यामंदिरातील शैक्षणिक दर्जा आणखी उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही बनकर यांनी सांगितले.
कार्यक्रमास देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, मुख्याध्यापिका स्वाती गाडे, शिक्षिका शशिकला मडीखांबे, वंदना शिर्के, जयश्री माने, गिरीश पवार, संजय पवार, सागर गोंडाळ, सुनील नायकोडी, रमेश शिंदे सर, संजय मोरे तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.















